‘टी-20’ सामन्यात पंतच्या नेतृत्वाची ‘कसोटी’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१२ जून । यंदाच्या टी-20 मालिकेत केवळ ‘अपघाता’नेच नेतृत्वाची कवचकुंडले सांभाळत असलेल्या रिषभ पंतसमोर आज (रविवार दि. 12) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया दुसऱया टी-20 सामन्यात आणखी एकदा बाका प्रसंग उभा ठाकलेला असणार आहे. 3 सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय खेचून आणणे महत्त्वाचे असल्याने पंतच्या नेतृत्वाची येथे खऱया अर्थाने कसोटी लागेल. ही लढत सायंकाळी 7 वाजता खेळवली जाणार आहे. तूर्तास, आफ्रिकन संघ मालिकेत 1-0 फरकाने आघाडीवर आहे.

यापूर्वी, नवी दिल्लीत संपन्न झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने द्विशतकी मजल मारत फलंदाजी लाईनअप फॉर्मात असल्याची जोरदार वर्दी दिली. मात्र, डेव्हिड मिलर व रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन यांनी भारतीय गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडत अशक्यप्राय विजयावर शिक्कामोर्तब करत अवघ्या क्रिकेट वर्तुळाला आश्चर्याचा धक्का दिला होता.

पंतकडे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आगामी कर्णधार म्हणून पाहिले जाते. मात्र, आयपीएल स्पर्धेपासून त्याचा प्रवास उतरणीकडे लागला आहे. त्यातच, ही मालिका गमावल्यास त्याच्यासाठी हा आणखी एक धक्का ठरेल. यंदाचा आयपीएल हंगाम पंतसाठी निराशाजनक ठरला असून तो दिल्ली कॅपिटल्सला प्ले-ऑफमध्येही स्थान निश्चित करुन देऊ शकला नव्हता. याचदरम्यान हार्दिक पंडय़ाने नेतृत्वात चुणूक दाखवून देत स्पर्धा निर्माण केली आहे.

कर्णधार या नात्याने पंत यशस्वी होणार का, याचा आताच अंदाज वर्तवणे घाईचे ठरु शकते. पण, नेतृत्वाच्या पदार्पणात पंत दडपणाखाली राहत आला असल्याचे त्याच्या बॉडी लँग्वेजवरुन दिसून येत राहिले आहे. आयपीएलमधील पर्पल कॅप विनर यजुवेंद्र चहलला पहिल्या टी-20 सामन्यात पंतने केवळ दोनच षटके दिली, तो निर्णय वादग्रस्त ठरला होता. आज दुसऱया सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी पंतसमोर गोलंदाजीची मुख्य चिंता असणार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी अर्शदीप सिंग व उमरान मलिक यांना संधी देण्याबाबत विचार होऊ शकतो.

संघातील सर्वात अनुभवी सीमर भुवनेश्वर कुमारची डेथ ओव्हर्समध्ये बरीच धुलाई झाली. शिवाय, हर्षल पटेल देखील महागडा ठरला. अवेश खान प्रभाव टाकू शकला नाही. मात्र, सर्व गोलंदाजात तो सर्वात किफायतशीर राहिला. अर्शदीप व मलिक यांनी नेट्समध्ये कसून सराव केला असून आजच्या लढतीत या दोघांपैकी एकाला संधी मिळाल्यास त्यात आश्चर्याचे कारण नसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *