विधान परिषद निवडणुक ; ‘आमदारांनो, बॅग भरा अन् मुंबईत या!’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१५ जून । राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेतही भारतीय जनता पक्ष फोडाफोडी करण्याच्या शक्यतेने महाविकास आघाडीतील घटक पक्ष ताकही फुंकून पीत आहेत. या निवडणुकीतही तिन्ही पक्षाच्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे. त्यासाठी पुढच्या तीन-चार दिवसांत पक्षांनी आपापल्या आमदारांना पुन्हा एकदा बॅगा भरून मुंबईत बोलविण्यात येईल.

आमदारांसाठी शिवसेनेने आता ‘ट्रायडंट’ऐवजी पवईतील ‘रेनिसन्स’ हे हॉटेल आरक्षित केले आहे. याच ठिकाणी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांच्या बैठका होणार असल्याने आमदारांना तेथून थेट मतदानासाठी आणण्यात येईल. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार संघर्ष झाला. त्यातून दगाफटका होऊन शिवसेनेचा एक उमेदवार पराभूत झाला. आता तसा धोका नको म्हणून आमदारांना सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाला, परंतु, काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने पुन्हा घोडेबाजाराची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्येच राहणार आहे. आमदारांना सहजासहजी कोणी भेटणार नाही आणि त्यांच्याबरोबर कोणीही चर्चा करू शकणार नाही, अशी आशा महाविकास आघाडीला आहे. भाजपचेही आमदार एकाच ठिकाणी राहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *