महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ जून । आळंदी – पालखी प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी चंदनाचा टिळा अन् खांद्यावरील भगवी पताका उंचावत हजारोंच्या संख्येने राज्यभरातून वारकऱ्यांचा ओघ आळंदीत सुरू आहे.
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २१) देऊळवाड्यातून पंढरीच्या दिशेने होणार आहे. पालखी सोहळ्यातील वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून अनेकांची पावले आळंदीकडे वळू लागली आहेत. खांद्यावर भगव्या पताका घेत वारकरी आळंदीत येत आहेत. प्रदक्षिणा मार्ग आणि इंद्रायणी नदीच्या काठावर वारकरी दिसत आहेत.
कोरोनाच्या महामारीने दोन वर्षे वारी खंडित झाली होती. अनेकांनी घरात बसूनच नामस्मरण केले. मात्र, काळजी घेत वारकरी वारीत सहभागी होत आहेत. अनेकांनी लसीकरण करूनच वारीत सहभागी झालो असल्याची माहिती दिली. अनेकांच्या तोंडावर मास्क नसले; तरी कापडी गमच्या, तर महिलांकडे स्कार्फ आणि पदर गुंडाळून खबरदारी घेत असल्याचे चित्र आहे. एकंदर भाविक स्वतःची काळजी घेताना दिसत आहेत. ठिकठिकाणी राहुट्या अन् तंबूतून मुक्काम करत आहेत. धर्मशाळांमधून वारकरी थांबत आहेत. सिद्धबेट, गोपाळपुरा, वडगाव रस्ता भागात वारकऱ्यांची विशेष गर्दी दिसत आहे.
भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी अंतिम आढावा बैठक प्रांत अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी घेतली. पालिका आजही अतिक्रमणे काढत होती. पाणीपुरवठा चोवीस तास विभागवार केला जात आहे, तर शहरात धुरळणी आणि जंतुनाशक पावडर मारली जात आहे. भाविकांसाठी मुबलक रॉकेल आणि गॅस सिलिंडर वाटप सुरू आहे. रॉकेलचा काळा बाजार होत असल्यास महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.