महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ जून । महाराष्ट्रात मान्सूनचे आगमण झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. संपूर्ण मृग नक्षत्र पावसाशिवाय गेला असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, मध्यरात्रीपासून राज्यातील काही भागांत पावसाने एंट्री केली असल्याचे चित्र आहे. यामध्ये मुंबईसह कोकणातील काही भागात आणि विदर्भातील अमरावती येथे पावसाने ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
राज्यात गेल्या २४ तासात अनेक जिल्ह्यांमध्ये गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या अखेरीस राज्यात मान्सून सक्रीय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानुसार काही प्रदेशात पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला आहे. चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव येथे सलग ३ तास सुरू असलेल्या पावसाने गावाच्या चौकातील टपऱ्यांसमोर उभी असलेली दुचाकी वाहने वाहून गेल्याचंही पाहायला मिळालं.
पेरणीच्या तयारीत असणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती. जूनचा अर्धा महिना संपला तरी पाऊस न पडल्याने बळीराजा काहीसा चिंतेत होता. मात्र अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील तिवसा, चांदुर रेल्वे, चांदुर बाजार, अचलपूर, परतवाडा, अंजनगाव, धारणी आणि चिखलदरा या भागातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी काहीसा सुखावला आहे.
दरम्यान, आज सकाळपासून मुबंई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने सुरुवात केली आहे. मान्सून उशिरा दाखल झाल्याने शेतीची कामे पूर्णपणे रखडली होती. काहींनी पाऊस लवकर होणार या बातमीमुळे आधीच पेरणी करुन ठेवली होती. त्यामुळे आता या पावसामुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अमरावतीत मात्र अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.
पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी वाहून गेल्या. तसंच अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवण्यात आलेले धान्य मोठ्या प्रमाणात ओले झाले आहे. यामध्ये हरभरा, तूर आणि काही प्रमाणात सोयाबीन अशी सुमारे २००० ते २२०० धान्याची पोती ओली झाली आहेत. कृषी विभागाने केलेल्या आवाहनानुसार कोरडवाहू शेतकर्यांनी पेरण्या थांबवल्या होत्या. मात्र पावसाने सुरवात केल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे.