महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ जून । भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जागतिक क्रिकेटमध्ये मोठे स्थान आहे. धोनीला जगातील उत्कृष्ट कर्णधार आणि सर्वोत्तम फिनिशर मानलं जातं. धोनीनं एकट्याच्या जोरावर भारताला अनेक अशक्य वाटणारे सामने जिंकून दिले आहेत. जेव्हा-जेव्हा धोनी शेवटच्या षटकांमध्ये क्रीझवर असायचा, तेव्हा विरोधी संघाची अवस्था कमकुवत दिसायची. धोनीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत, परंतु आजही एमएस धोनीचे नाव जगातील उत्कृष्ट फिनिशरमध्ये घेतलं जातं.
मायकल बेवननं आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट मध्ये असं लिहलंय की,”धोनी एक उत्तम फिनिशर होता. या स्तराचा खेळाडू होण्यासाठी तुमच्याकडं अनेक चांगल्या कौशल्यांची जोड असणं आवश्यक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रणनीती. प्रत्येक परिस्थितीत सर्वोत्तम शॉट्सची निवड करणं तुमच्या संघाला सामने जिंकण्यात मदत करू शकते.”
धोनीनं त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत 10 हजार धावांचा टप्पा गाठलाय. त्यानं एकदिवसीय सामन्यात एकूण 350 सामने खेळले आहेत. यातील 297 डावात 50.57 च्या सरासरीनं 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 87.56 इतका होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 10 शतक आणि 73 अर्धशतकांची नोंद आहे. एवढेच नव्हेतर 84 वेळा नाबाद राहण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धोनी पाचव्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत तो तब्बल 10 वर्ष पहिल्या दहामध्ये होता.