महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१९ जून । शनी शिंगणापूर (Shani Shingnapur)हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी देशभरातून शनिभक्त दर्शनासाठी येत असतात. साडे साती घालवण्यासाठी अनेक भाविक शनीदेवाला तेलाचा अभिषेक घालतात. ही परंपरा असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने शनीदेवावर तेल अर्पण करतात. पूर्वी सर्व भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तैलाभिषेक करता येत होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून भक्तांना चौथऱ्यावर जावून तेलाचा अभिषेक घालण्यास मनाई केलेली होती.
तसेच शनिशिंगणापूरमध्ये आता चौथऱ्यावर महिलांना देखील तैलाभिषेक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिशिंगणापूर येथील चौथरा पुन्हा एकदा सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे. विश्वस्तांच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भाविकांना चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा ही भक्तांची सातत्याने होत असलेली मागणी संस्थानने स्वीकारली आहे. मात्र ज्या भाविकांना शनी देवाला तेल अभिषेक करायचा आहे त्यांना देणगी म्हणून ५०० रुपाये मोजावे लागणार आहे. ५०० रुपयांची देणगी पावती घेणाऱ्या सर्व महिला किंवा पुरुषांना चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करता येणार आहे,अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अध्यक्ष भागवत बानकर यांच्या कडून देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरू झाली.भाविकांना तेल अभिषेक पावतीकरता देवस्थानचे विक्री काऊंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे सरचिटणीस अप्पासाहेब शेटे यांनी सांगितले.