महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे आवश्यक बहुमत पूर्ण झालं असून सर्व तांत्रिक बाबी झाल्या आहेत, असं विधान केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आता ही कायदेशीर लढाई आहे. त्यांच्यासोबत काही आमदार आहेत. कुणी म्हणतं ४० आहेत, कुणी म्हणतं १४० आहेत. ज्या दिवशी आमदार मुंबईत येतील त्यादिवशी त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची खरी कसोटी लागणार आहे. ज्यावेळी विधानसभेत हा प्रश्न जाईल तेव्हा महाविकास आघाडी सरस ठरेल यात शंका नाही”, असं संजय राऊत म्हणाले.
“कागदावर संख्याबळ दिसेल पण ही लढाई आता कायदेशीर लढाई आहे. शिवसेना हा महासागर आहे आणि महासागर कधी आटत नसतो. १२ आमदारांवर कारवाईबाबत आम्ही पत्र दिलं आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय होईल आणि कायदेशीर लढाई लढली जाईल”, असं संजय राऊत म्हणाले.