शिवसेनेकडून शिंदे गटातील एकूण 16 आमदार अपात्रतेची मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२४ जून । शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आमदारांसह आधी सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलं. आता शिंदे गटाकडून त्यांच्याकडे 48 आमदार असल्याचा दावा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत बंड पुकारलं आहे. यानंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने आधी 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले होते. आता सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

आधी 12 आमदारांवर कारवाईसंदर्भात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली होती. पहिल्या टप्प्यात 12 नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आता दुसऱ्या टप्प्यात आणखी 4 आमदारांवर अशी कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदा सरवणकर हे मुंबईच्या माहिम मतदारसंघातून विधानसभा आमदार आहेत. ते दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलताना दिसले होते. नंतर ते शिंदे गटाला जाऊन मिळाले. तर प्रकाश आबिटकर हे कोल्हापूरच्या राधानगरी मतदारसंघातून आमदार आहेत. संजय रायमूलकर हे बुलढाण्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून गेले आहेत तर रमेश बोरनारे औरंगाबादच्या वैजापूर मतदारसंघाचे आमदार आहेत.

कोण आहेत 16 आमदार ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय?
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार
3) संदीपान भुमरे
4) प्रकाश सुर्वे
5) तानाजी सावंत
6) महेश शिंदे
7) अनिल बाबर
8) यामिनी जाधव
9) संजय शिरसाट
10) भरत गोगावले
11) बालाजी किणीकर
12) लता सोनावणे
13) सदा सरवणकर
14) प्रकाश आबिटकर
15) संजय रायमूलकर
16) रमेश बोरनारे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *