![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ जून । ग्राहकोपयोगी वस्तू उद्योगांसाठीच्या उत्पादन आधरित सवलत योजनेच्या (पीएलआय) टप्पा 2 ला ( PLI scheme ) केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार खात्याचे अतिरिक्त सचिव अनिल अगरवाल यांनी आज ( दि.28) पत्रकारांशी बोलताना दिली. दुसऱ्या टप्प्याचा लाभ 15 कंपन्यांना मिळणार असून या कंपन्या सुमारे चौदाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील ‘पीएलआय’ योजनेमुळे आगामी पाच वर्षात 25 हजार 583 कोटी रुपयांचे वाढीव उत्पादन होणार आहे तर चार हजार लोकांना यामुळे रोजगार मिळणार असल्याचे अगरवाल यांनी स्पष्ट केले. घरांमध्ये लागणाऱ्या दैनंदिन वापराच्या वातानुकूलीत यंत्रणा, फ्रिज, वॉशिंग मशीन, एलईडी टीव्ही आदी वस्तुंचा प्रामुख्याने व्हाईट गुड्स वस्तुंच्या श्रेणीत समावेश होतो.
पीएलआयच्या दुसऱ्या टप्प्यात ज्या कंपन्यांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यात सहा कंपन्या वातानुकूलीत यंत्रणा अर्थात एसी बनविणाऱ्या असून 9 कंपन्या एलईडी बनविणाऱ्या आहेत. एसी बनविणाऱ्या कंपन्या 968 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील पीएलआय योजनेचा लाभ घेण्यासाठी एकूण् 17 कंपन्यांनी अर्ज केले होते. यातील मित्सुबिशी, एलजी इलेक्ट्रॉनिक्स, अडानी कॉपर, जिंदाल पॉलिफिल्मस्, एस टेक, स्वामीनाथन एंटरप्राईजेस, विप्रो एंटरप्राईजेस? ल्यूमेन्स, क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपन्यांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती अगरवाल यांनी दिली.