महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । आम्ही उद्या मुंबईत येणार असल्याची घोषणा बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीत केली आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनानंतर बोलताना शिंदे म्हणाले, महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुख-समृध्दी शांतीसाठी नवस मागितलं. सर्व आमदारांसोबत बहुमतासाठी उद्या मुंबईत पोहोचणार आहे. दरम्यान, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे हे गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले. त्यानंतर ते प्रसिद्ध कामाख्या मंदिराच्या दिशेने रवाना झाले. मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले. शिंदे यांच्यासोबत काही आमदारदेखील होते.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या गटाने पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. याच दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानभवन सचिवालयाला पत्र पाठवले आहे. त्यासाठी उद्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. उद्या सकाळी ११ ते ५ दरम्यान विशेष अधिवेशन होणार असून यादरम्यान ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.