महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ जुलै । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडानंतर आपल्या शिवसैनिकांना आश्वस्त केले. कोणीही कुठेही गेले तरी शिवसेना संपणार नाही. आता अधिक जोमाने काम करुया.धनुष्यबाण कोणीही घेऊ शकत नाही. कायद्याच्यादृष्टीने बघितलं तर धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ती चिंता सोडा, असे आश्वस्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्याचवेळी आम्हाला ‘मातोश्री’ बोलावले तर परत जाऊ, पण भाजपशी त्यांनी जुळवून घेतले पाहिजे, असे बंडखोर आमदारांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. आता उद्धव ठाकरे यांनी थेट बंडखोर आमदारांना उत्तर देत त्यावर पडदा पाडला आहे.
उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषेदेत सांगितले की, इतके दिवस जे गप्प होते. ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपशी बोलणी केली तर येऊ, असे म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सुरतला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरे झाले असते असे म्हटले होते. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती.
हेच प्रेम याच घराण्यावर टीका करत असताना का विरोध केला नाही. विकृत टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचे प्रयत्न केले त्यांच्यासोबत तुम्ही गेलात. आता त्यांच्याशी काय बोलायचं. गाठीभेटी घेत आहात, त्यांना मिठ्या मारत आहात. मग तुमचे हे प्रेम खरं आहे की तकलादू आहे?, अशी थेट विचारणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
आणि उद्धव ठाकरे यांनी मानले आभार…
या लोकांना मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्यबद्दल प्रेम आहे याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानत आहे. आजदेखील तिकडे गेल्यानंतरही आमच्याबद्दल प्रेम वाटत आहे, याबद्दल धन्य झालो. (हात जोडून) पण हेच प्रेम गेली अडीच वर्ष जी लोक, पक्ष याच घरावर, कुटुंबीयांवर विकृत भाषेत टीका करत होती, तेव्हा कोणाही काहीही बोलले नाहीत. यांच्यापैकी एकानेही त्याला विरोध केला नव्हता, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिंदे गट – उद्धव ठाकरे एकत्र यावेत हीच शिवसैनिकांची भावना आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. पण आम्हाला बोलावताना त्यांना भाजपशीदेखील चर्चा करावी लागेल. उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून भाजप नेतृत्त्वाशी बोलावे, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले होते.
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठांना फोन केला तर ही लढाई थांबेल. तसेच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांसारखं मोठं मन दाखवायला हवं, याच्यातून चांगला मार्ग निघावा हीच अपेक्षा असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटले होते.