महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । अभूतपूर्व आर्थिक अडचणींनी घेरलेल्या श्रीलंकेत दुसऱ्या दिवशीही जनतेचा उठाव सुरूच होता. हजारो लोक राष्ट्रपती भवन, त्यांचे समुद्रकिनाऱ्यावरील कार्यालय आणि पंतप्रधान निवासस्थान पाहण्यासाठी येत आहेत. सत्तेचे हस्तांतरण शांततेने झाले आहे. दोन दिवसांत हिंसाचाराची कुठलीही घटना घडलेली नाही. निदर्शकांनी म्हटले की, राष्ट्रपती गोटबाया आणि पंतप्रधान विक्रमसिंघे 13 जुलैपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आम्ही राष्ट्रपती भवन रिकामे करणार नाही. दोघांच्या राजीनाम्यांनंतर संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा कार्यकारी राष्ट्रपती होतील.
राजीनाम्यासाठी 13 जुलै का? :
13 जुलैला बुद्धपौर्णिमा आहे. येथे ही पौर्णिमा ‘एसला पोया’ च्या रूपात साजरी केली जाते, ती भगवान गौतम बुद्धांच्या पहिल्या उपदेशाशी आणि बौद्ध धर्माच्या स्थापनेशी संबंधित आहे.
श्रीलंकेला सर्व प्रकारे मदत करू :भारत भारताने श्रीलंकेला सर्व प्रकारची मदत देऊ, असे म्हटले आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, श्रीलंकेतील आर्थिक-राजकीय संकटावर तोडगा काढण्यासाठी भारत तयार आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी श्रीलंकेतील संकटावर राजकीय तोडगा काढण्याचे आणि त्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे. आयएमएफ, संयुक्त राष्ट्रांनीही मदतीचा प्रस्ताव दिला आहे.
कोलंबोत लष्कर तैनात :
संपूर्ण कोलंबोत लष्कर तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी पंतप्रधानांचे घर पेटवून दिल्याच्या आरोपावरून तिघांना अटक केली. राष्ट्रपती भवनाच्या विशेष कक्षातून 1.72 कोटी रुपये रोख मिळाल्याचा दावा निदर्शकांनी केला आहे.