महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ जुलै । शिवसेनेचा हिंगोली जिल्हाप्रमुख तूच आहेस. तुला कोणीही पदावरून काढू शकणार नाही, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना जनतेची कामे नव्या जोमाने करण्याचा सल्ला सोमवारी सकाळी दूरध्वनीवरून दिला. त्यामुळे आमदार बांगर यांना दिलासा मिळाला आहे.
सकाळीच शिवसेनेकडून बांगर यांची हिंगोली जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोन करत त्यांना दिलासा दिला आहे. पद सोडण्याचे कारण नाही. आता जनतेची नव्या जोमाने कामे करा, जनता आपल्या सोबत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
मला हिंगोलीच्या जिल्हाप्रमुख पदावरुन हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही. मीच शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो आणि राहणार, असा पवित्रा संतोष बांगर यांनी घेतला आहे.
हिंगोली जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्याचे काम आमदार संतोष बांगर यांनी केले. शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी व सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आक्रमकपणे आंदोलने केली. विशेषतः शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रोहित्र मिळत नसल्याने आमदार बांगर यांनी अनेक वेळा वीज कंपनीत जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले अन रोहित्र देण्यास भाग पडले आहे.
दरम्यान, आमदार संतोष बांगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यामुळे त्यांचे जिल्हा प्रमुखपद काढले जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. तर हिंगोली येथे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद जाधव यांनी बैठक घेऊन लवकरच शिवसेनेचा जिल्हा प्रमुख जाहीर केला जाईल, असे सांगितले होते. त्यामुळे नवा जिल्हा प्रमुख कोण याबाबत चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज शिवसेना कार्यालयातून आमदार संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हा प्रमुख पदावरून काढल्याचे आदेश निघाले.