महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । मुंबई-कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या पाच दिवसांत मुसळधार पाऊस पडला. धरणे तुडुंब भरल्याने विसर्ग करण्यात आला. नदी-नाल्यांना पूर आले. या नैसर्गिक आपत्तीत सुमारे ९० लोकांचे जीवही गेले. प्रशासन, राखीव दलाचे जवान युद्धपातळीवर बचावकार्य करत आहेत. नवनियुक्त सरकार मात्र या मदतकार्यात कुठेही दिसत नाही. याचे कारण म्हणजे सध्या फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच राज्याचा गाडा हाकत आहेत. सरकार स्थापन होऊन १४ दिवस उलटले तरी नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेले नाही. ६० हून अधिक खाती शिंदेंनी स्वत:कडेच ठेवली आहेत. परिणामी राज्याला आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र मंत्री-राज्यमंत्री नाहीत. तसेच आपत्तीग्रस्त ३६ जिल्हेही पालकमंत्र्यांविना ‘पोरके’ आहेत. मग व्यथा मांडायची कुणाकडे, असा प्रश्न जनतेपुढे आहे.