महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ जुलै । योगी आदित्यनाथ सरकारने 15 ऑगस्टची सुटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमांतर्गत या दिवशी उत्तर प्रदेशमधील सर्व शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि खासगी कार्यालयांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्टदरम्यान उत्तरप्रदेशमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गेले वर्षभर केंद्र सरकारच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. अमृतमहोत्सवानिमित्त पुढील 15 दिवस केंद्राच्या वतीने कोरोनाचा बुस्टर डोस मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात तर जय्यत तयारी सुरू आहे. नागरिकांमध्ये उत्साह दिसून येतोय. 12 जुलै रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी त्याच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीला स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाच्या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये ‘हर घर तिरंगा’ या कार्यक्रमाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.