जालना हादरलं ; माय-लेकांचा निर्घृण खून ; शेतात शौचास बसण्यावरून झाला वाद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६  जुलै । शौचास बसण्यास विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून दोघा मायलेकांचा निर्घृणपणे खून केल्याचा भयानक प्रकार जालना तालुक्यातील एरंडवडगाव शिवारात असलेल्या अचानक तांडा येथे घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमनबाई देवीलाल सिल्लोडे (55), आणि मंगेश देवीलाल सिल्लोडे (25) असं या मायलेकाचं नाव आहे. देवीलाल सिल्लोडे यांची गावाजवळच शेती असून या शेतात गावातील शिंदे कुटुंबातील काही मुले याच शेतात नियमितपणे हे शौचास बसत असत. या सर्व गोष्टींना सिल्लोडे कुटुंबातील सदस्यांचा विरोध होता.

काल शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास शेतात संडासला बसण्यास विरोध केल्याच्या कारणावरून सिल्लोडे यांच्या कुटुंबाला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण करीत चाकूने भोसकले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सिल्लोडे कुटुंबाला तातडीने जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

मात्र, तत्पूर्वीच, सुमनबाई देवीलाल सिल्लोडे (55), आणि मंगेश देवीलाल सिल्लोडे (25) या मायलेकाचा रस्त्यातच मृत्यू झाला. तर देवीलाल सिल्लोडे आणि योगेश सिल्लोडे यांची प्रकृती गंभीर असून, जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी सेवली पोलिसांनी विजय शिंदे, सुधाकर शिंदे, शितल शिंदे, तुकाराम शिंदे, मुंगळया भोसले, छकुली शिंदे, रंजना पवार, सुरेखा शिंदे, चिंटू शिंदे आणि एक जाड व्यक्ती अशा दहा जणाविरुद्ध आज पहाटे गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, परतुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे, मौजपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे पाटील, सेवलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. एन. उबाळे, परतुरचे पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे आदींनी रात्रीच तातडीने घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *