महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ जुलै । काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीची चौकशी सुमारे अडीच तास चालली. यादरम्यान राहुल गांधी पक्षाच्या खासदारांसह विजय चौकाजवळ चौकशीविरोधात धरणे देत होते, दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, सरकार ना चर्चा करत आहे, ना बोलू देत आहे.
काँग्रेस नेत्यांना आंदोलन करण्यापासून रोखल्याबद्दल सचिन पायलट यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून नेत्यांना लक्ष्य करत आहे.
राहुल यांच्याशिवाय काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, शक्तीसिंह गोहिल यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. या खासदारांना पोलीस अज्ञात ठिकाणी घेऊन जात असल्याचे काँग्रेसने ट्विट केले आहे. हे सर्व काँग्रेस खासदार संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत निषेध मोर्चा काढत होते.
काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी आरोप केला की, दिल्ली पोलीस काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना राजघाटावरही जाऊ देत नाहीत. आम्हाला निदर्शने करण्यापासून रोखले जात आहे. यादरम्यान कार्यालयाबाहेर महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे फुगे सोडून निषेध व्यक्त केला.