ईडी ची झोप उडवली ; या अभिनेत्रींच्या घरातून पुन्हा कोट्यवधींचं घबाड जप्त, पैसे मोजण्यासाठी अधिकारी पडले कमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ जुलै । : पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती (West Bengal SSC Scam) घोटाळ्यामध्ये ममता बनर्जी यांच्या (Mamata Banerjee) सरकारमधील उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्ती अर्पिता मुखर्जी (Arpita mukherjee) यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरु आहे. अर्पिता मुखर्जी यांच्या कोलकात्यातील घरातून पुन्हा कोट्यवधी रुपयांचे घबाड जप्त करण्यात आलं आहे. त्यांच्या घरातून ईडीनं 29 कोटी रुपयांची रोकड आणि 5 किलो सोनं जप्त केलं आहे.

दरम्यान, अर्पिता मुखर्जी यांच्यावर ईडीची ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापूर्वी अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून तब्बल 21 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा 29 कोटींची रोकड आणि 5 किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. नोटांची ही रोकड पाहून हे घर आहे बँकेचा लॉकर असा प्रश्न पडत आहे. एवढे पैसे मोजण्यासाठी अधिकारीही कमी पडू लागले. त्यामुळं पैसे मोजण्यासाठी नोटा मोजण्याचे मशीन मागवावं लागलं. तसेच नोटांनी भरलेल्या बॅगा नेण्यासाठी ईडीला मोठा ट्रक देखील बोलवावा लागला. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. हा घोटाळा 50 कोटींचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्याची ईडीची कारवाई पाहता हा घोटाळा शेकडो कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सर्व मुद्यावर भाजप ममता सरकार विरोधात आक्रमक झाली आहे. याविरोधात पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या वतीनं रॅली देखील काढण्यात येणार आहे.

22 जुलैला 21 कोटी जप्त

दरम्यान, यापूर्वी 22 जुलै रोजी ईडीने अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून 21 कोटी रुपयांची रोकड जप्त केली होती. त्यानंतर पार्थ चॅटर्जी यांची दीर्घ चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, यापूर्वी अर्पिता मुखर्जीकडून दोन डायरी जप्त करण्यात आल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील एका डायरीमध्ये अर्पिता मुखर्जीने तिच्या बँक खात्यात जमा केलेल्या रोख रकमेची माहिती आहे. अर्पिता मुखर्जीकडे ही रोकड कुठून आली हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. या डायरीमध्ये विविध बँकांमध्ये अनेक वेळा रोख रक्कम जमा केल्याचा तपशील आहे.

शिक्षक भरती घोटाळा

पश्चिम बंगालच्या सरकारमधील एका मंत्र्यावर करण्यात येत असलेली कारवाई ही संपूर्ण शिक्षक भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. 2016 मध्ये ही भरती प्रक्रिया सुरु झाली होती. ज्यामध्ये बनावट पद्धतीने प्रवेश मिळवण्यासाठी ओएमआर शीटमध्ये फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये लाखो रुपयांची लाच घेऊन नापास उमेदवारांना उत्तीर्ण करण्यात आलं होतं. या प्रकरणात थेट शिक्षणमंत्र्यांचा हात असल्याचा आरोप देखील केला होता. तसेच यामध्ये अनेक लोक सामील असल्याचे सांगण्यात येत आहे, ज्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *