महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । “मी मरणार तर भगव्या झेंड्यामध्येच मरणार… तेव्हा उध्दव ठाकरेंची शिवसेना होती. आता मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत आहे. बाळासाहेबांचे विचार असलेल्या शिवसेनेत आहे,” असं विधान रामदास कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केलं आहे.
रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते पदाचा राजीनामा दिला होता, तर शिवसेनेनं रामदास कदम यांची हकालपट्टी केल्याचं म्हटलं होतं. “हा दिवस कधी येईल असं वाटलं नव्हतं. आमच्यावर अशी वेळ येईल असं वाटलं नव्हतं. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला. आम्ही तुमचं काही वाईट केलं नाही. आम्ही काही चूक केली नाही,” असं राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी म्हटलं होतं.
उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर ‘प्रॉब्लेम’ काय आहे? या प्रश्नावर बोलताना रामदास कदम यांनी म्हटलं, “ज्या शिवसेनाप्रमुखांनी त्यांचं उभं आयुष्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष करण्यात आणि हिंदुत्व वाढवण्यात घालवलं अशा पक्षांबरोबर जाऊन उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले हा आम्हाला ‘प्रॉब्लेम’ आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलंय असं मला वाटतं.”
“हे जेव्हा घडत होतं तेव्हा मी सांगितलं होतं की, कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर जाऊ नका नाहीतर बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. हे मी ‘मातोश्री’वर जाऊन बोललो आहे. त्यावर उध्दव ठाकरेंनी काहीही उत्तर दिलं नाही.”
“बाळासाहेब ठाकरे असते तर उध्दव ठाकरेंना कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? हा प्रश्न महाराष्ट्रात कोणालाही विचारा…हा आमचा प्रॉब्लेम आहे,” असंही रामदास कदम यांनी म्हटलं.