महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑगस्ट । शिंदे आणि फडणवीस यांनी शपथ घेऊन 35 हून अधिक दिवस झाले असून अखेर आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यात भाजपच्या 9 तर शिंदे गटाच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या विस्तारावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
खातेवाटपातही समसमान वाटा असेल का? असा सवाल केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, आता आम्ही युती म्हणून एकत्र आलो आहोत. संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने चर्चांना सुरुवात झाली आहे. यावरही शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एका माध्यमाशी बोलताना शिंदे यांनी सांगितलं, की मागील महाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड यांना क्लिन चिट दिली होती. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. आणखी कुणाला काही म्हणायचे असेल तर त्यांनी सांगावे, लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी राठोड यांना क्लिन चिट दिली आहे. त्यामुळे राठोडांना मंत्रिमंडळात घेतले. जर कुणाच्या काही सुचना असेल तर त्या घेतल्या जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.