दोन दिवसांमध्ये खातेवाटप, निवडणुका कधी? मुनगंटीवारांनी सांगितली तारीख

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होऊन दोन दिवस झाले आहेत, पण अजूनही मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. भाजप नेते आणि मंत्रीपदाची शपथ घेतलेले सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दोनच दिवसांमध्ये खातेवाटप होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मी तुम्हाला विधिमंडळ रुल्सची माहिती देतो. खातेवाटप झालं नाही तरी मंत्रालयाचं कामकाज थांबत नाही, पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोन दिवसांमध्ये खातेवाटप होईल, असं सांगितल्याचं मुनगंटीवार म्हणाले. तसंच सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका होतील, असंही मुनगंटीवार म्हणाले.

‘चर्चा करणारे आमची सत्ता आली हेच पचवू शकत नाहीत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ महिला नेत्या विचारतात एकही महिला मंत्रिमंडळात नाही, मात्र महाविकासआघाडीचे पहिले मंत्रिमंडळ बनले तेव्हा एकही महिला नव्हती, त्यामुळे पॉलिटिकल अल्झायमर होता कामा नये,’ असा टोला मुनगंटीवार यांनी सुप्रिया सुळे यांना हाणला.

‘मंत्रिमंडळ नव्हते तेव्हाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम करतच होते. फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या आतापर्यंतच्या सगळ्या बैठकांमध्ये आम्ही भरभरून निर्णय घेतले आहेत. आधीच्या सरकारमध्ये सुरुवातीच्या बैठकीत कोणतेही निर्णय झाले नव्हते. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या अनेकवेळा घोषणा केल्या पण पूर्तता केली नाही,’ असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी केलं. ‘शिवसेना आमच्याशी आणि जनतेशी बेईमानी करून सत्तेत आली. एक कपोलकल्पित कहाणी सांगितली गेली की आम्हाला अडीच वर्षांचा शब्द दिला गेला होता. आता भिंती बोलू शकत नाहीत. प्रचारात भाजपचा मुख्यमंत्री हे मान्य करून प्रचार केला. निवडणुकीनंतर आमचे 105 आमदार आले, तेव्हा सेनेविना सरकार येऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर शिवसेना बदलली, मोलभाव सुरू केले,’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

‘महाविकासआघाडी सरकार बसल्यानंतर शिवसेनेत उठाव झाला. जनता सगळं ओळखते, जनता है यह सब जानती है. कितीही विषारी प्रचार केला तरीही काही होत नाही. आमच्यात एक वाक्यता आहे. शिंदे आणि फडणवीस एकत्रित काम करत आहेत. दोन पक्ष नाही तर एकच पक्ष आहे. जनतेच्या हिताचा पक्ष आहे,’ अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

‘जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी सक्रीय विरोधी पक्ष असणं आवश्यकच आहे. शरद पवारांनी विरोधी पक्ष म्हणून सक्रीय होण्याची सूचना योग्यच आहे. शरद पवारांचे संकल्प होते, त्यांच्या पुतण्याचा मुख्यमंत्री व्हायचा संकल्प आहे. पण संकल्प जनतेने करणं महत्त्वाचा आहे,’ असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी हाणला.

‘हे भाजप आणि शिवसेनेचे सरकार आहे. कितीही प्रयत्न केले तरी भाजप-शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण होणार नाही’, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *