बीड जिल्ह्याने कोरोनाला लांब कसे ठेवले? आयसीएमआरचे पथक अभ्यास करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र24 ।बीड। विशेष प्रतिनिधी । आकाश शेळके । मराठवाड्यातील बीड जिल्हा हा देखील ग्रीन झोनमध्ये सहभागी झाला आहे. जिल्ह्यातील आष्टीमध्ये एकमेव कोरोनारुग्ण सापडला होता, त्याचाही अहवाल आता निगेटीव्ह प्राप्त झाला आहे. बीड जिल्ह्याने या महाभयंकर आजाराला लांब कसे ठेवले याचा अभ्यास करण्यासाठी आयसीएमआरचे पथक बीड जिल्ह्यात येणार आहे. बीड सह मराठवाड्यातील परभणी आणि नांदेड जिल्ह्यांचाही हे पथक दौरा करणार आहे.

आयसीएमआरच्या पथकाने बीड जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण का सापडला नाही ? अशी काय कारणं आहेत ज्यामुळे इथे या आजाराची लागण झाली नाही? हे तपासायचे ठरवले आहे. यासाठी बीड जिल्ह्यात रॅपिड अँटीबॉडी टेस्ट केल्या जाणार आहेत. १० जणांचं पथक बीड जिल्ह्यात येणार असून ते १० गावांमध्ये जाऊन समूह चाचण्या करणार आहे. जगभरात कोरोनाने हाहा:कार माजवलेला असताना बीड जिल्हा कोरोनामुक्त कसा झाला याची कारणे या चाचण्यांद्वारे शोधण्याचा हे पथक प्रयत्न करेल. कोरोनाची लागण झाली आहे, मात्र त्याची लक्षणेच दिसत नाही किंवा बीड जिल्ह्यातील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती जबरदस्त आहे या प्रश्नांचीही उत्तरे शोधण्याचा हे पथक प्रयत्न करणार आहे. सध्या बीड जिल्ह्यात एकही कोरोनाग्रस्त नसल्याने किंवा कोणाला तशी लक्षणेही दिसत नसल्याने जिल्ह्यात कोरोनाचे गुप्त वाहक किंवा सायलेंट कॅरिअर तर नाहीत याचाही शोध लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बीड जिल्ह्यात पथकाचे २ ते ३ दिवस वास्तव्य असेल असे कळते आहे. या दौर्‍यासाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पथकाला लागणारी वाहने , पोलीस बंदोबस्त, स्थानिक डॉक्टर यांचा ताफा या टीमसोबत असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *