महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । खरी शिवसेना कोणती? शिंदे आणि ठाकरे गटातील वादावर आज सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एनव्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी 8 प्रश्न तयार केले होते, ज्याच्या आधारे घटनापीठ शिवसेना कोणाची आहे, याचा निर्णय घेईल. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्ष चिन्हाच्या वादावर गुरुवारपर्यंत निर्णय न घेण्यास सांगितले होते.
गेल्या सुनावणीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आमच्यावर चुकीच्या पद्धतीने अपात्रतेचा आरोप लावण्यात आले आहेत. आम्ही अजूनही शिवसैनिक आहोत. दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात, वकील कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना सांगितले होते की, शिंदे गटात जाणारे आमदार जर त्यांनी वेगळा झालेला त्यांचा गट दुसऱ्या पक्षात विलीन केला तरच ते घटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार अपात्रता टाळू शकतात. त्यांना वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही, असेही ते म्हणाले होते.