महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । यंदाचा गणेशोत्सव ( Ganeshotsav ) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. निर्बंध मुक्त गणेशोत्सव असल्यामुळे यावर्षी गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे आतापासूनच गणेशमूर्तीची ( Ganesh Idol ) बुकिंग करण्यासाठी गणेशभक्त गणेशमूर्ती कारखान्यात गर्दी करताहेत. मात्र, दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईचा फटका या वर्षी गणेश भक्तांना देखील बसणार आहे. कारण कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे मूर्तीच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढल्या असल्याचे गणेश मूर्ती विक्रेते सांगतात.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर, यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्साह अतिशय छान आहे. परंतु कोरोना निर्बंध अगदी काही महिन्यापूर्वी हटवल्यामुळे मूर्ती जास्त प्रमाणात बनू शकल्या नाहीत. त्यामुळे मूर्तीच्या किंमती बाजारात वाढलेल्या आहेत. सोबतच बेस कलर, पीओपी, दागिने आदी कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तीच्या किंमती 30 टक्के एवढी वाढ झालेली आहे.