पुणे : गणेशोत्सवामुळे फळांना मागणी ; श्रावण संपताच ढोबळी मिरची, वांग्याच्या दरात घट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । मार्केट यार्डातील घाऊक फळभाजी बाजारात हिरवी मिरची, फ्लॅावर, गवार या फळभाज्यांच्या दरात वाढ झाली. ढोबळी मिरची, वांग्याच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२८ ऑगस्ट) राज्य, तसेच परराज्यांतून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ८ ते १० ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून २ ते ३ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून ३ टेम्पो घेवडा; तसेच ४ ते ५ टेम्पो कोबी, इंदूरहून ९ ते १० टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १३ ते १४ ट्रक लसूण, आग्रा, इंदूरमधून मिळून ५५ ट्रक बटाटा अशी आवक परराज्यांतून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले १२०० ते १३०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ५० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक वाढली आहे. कोथिंबीर, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, चुका आणि पालकाच्या दरात घट झाली आहे. अंबाडी आणि चवळईच्या दरात वाढ झाली असून चांगल्या प्रतीच्या पालेभाज्यांना मागणी आहे. पुदिना, राजगिरा, मुळा या पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीच्या दी़ड लाख जुडी; तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या जुडीमागे पाच रुपये, शेपू चार रुपये, चाकवत आणि चुका प्रत्येकी दोन रुपये, पालकाच्या जुडीमागे दहा रुपयांनी घट झाली आहे.

गणेशोत्सवामुळे फळांना मागणी वाढली आहे. फळांच्या दरात वाढ झाली आहे. डाळिंब, पेरु, पपई, लिंबू, कलिंगड, सीताफळ, खरबूज या फळांच्या दरात वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. चिकू, संत्री, मोसंबी, अननस या फळांचे दर स्थिर आहेत. फळबाजारात लिंबे एक ते दीड हजार गोणी, डाळिंब ४० ते ४५ टन, पपई १० ते १२ टेम्पो, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज ५ ते ६ टेम्पो, चिकू दीड हजार खोकी, सीताफळ ८ ते १० टन, संत्री १२ ते १५ टन, मोसंबी ७० ते ८० टन, पेरू ८०० ते ९०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *