महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) राज्यभरातून वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. यातच दसऱ्या मेळाव्यावरुन विरोधकांनी शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय. यातच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करत वर्मावरच बोट ठेवल्याचे सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी अनेकदा शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांचा गद्दार असा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली नाही. तर स्वतः उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केली, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे सारख्या कडवट शिवसैनिकाशी गद्दारी केली. पक्षातील आमदारांना कधीच सहकार्य केले नाही. जे काम केले ते फक्त नातेवाईक आणि मोतश्रीसाठी केल्याची टीका राणे यांनी केली आहे. भाजप आणि जनतेशी गद्दारी करत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले, असेही राणे यांनी म्हटले आहे.