महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी।आकाश शेळके।गेवराई (बीड) । कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासह यामुळे उद॒भवलेल्या संकटात अनेक घटक समोर येत आहेत. भविष्यात उद॒भवणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठीही मदतीचे हात पुढे होत आहेत. यातच माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या जयभवानी शिक्षण संस्थेने आरोग्य विभागाला तीन व्हेंटीलेटर दिले आहेत. संस्थेचे अध्यक्ष, अमरसिंह पंडित यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश शिंदे यांनी व्हेंटिलेटर स्विकारले.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात ही भेट अतिशय मोलाची असून इतरांनी सुद्धा अमरसिंह पंडित यांचे प्रमाणे पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले. कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे संकटात आलेल्या गरिब कुटूंबांना यापूर्वी श्री. पंडित यांनी पाच हजार गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. दरम्यान, आज घडीला कोरोनाबाबत बीड जिल्हा शुन्य असला तरी भविष्यात लॉकडाऊन खुले झाल्यानंतर काहीही परिस्थिती उद॒भवू शकते. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तीन हजारांवर रुग्णांना एकाच वेळी उपचार करता येईल, असे नियोजन सुरु केले आहे. यासाठी पाच कोव्हीड हॉस्पीटल्स, ११ कोव्हिड हेल्थ सेंटर्स व ११ कोव्हिड केअर सेंटरची उभारणी करण्यात येत आहे. दरम्यान, कोव्हीडचे निदान झालेल्या गंभीर रुग्णांसाठी व्हेंटीलेटर हे उपकरण अत्यावश्यक ठरणार आहे. आजघडीला जिल्ह्यात शासकीय आरोग्य यंत्रणेकडे २० व्हेंटीलेटर आहेत. शासनाकडून व्हेंटीलेटरची मागणी करण्यात आली आहे. मात्र, उपचाराच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे उपकरण अससलेले व्हेंटीलेटरासाठी जय भवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक व इतर कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा आरोग्य विभागाला तीन व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला.
तीन व्हेंटिलेटर उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे मंगळवार सकाळी संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित व कर्मचारी प्रतिनिधी यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य यंत्रणेला बहाल करण्यात आले. कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला वा आरोग्य यंत्रणेला झालेली जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी मदत आणि महत्वाचे उपकरणे आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, गटविकास अधिकारी श्री. बागुल, नायब तहसीलदार श्री. जाधवर, मुख्याधिकारी श्री. बिघोत यांचेसह अधिकारी उपस्थित होते.
कोरोना नंतर सुद्धा व्हेंटिलेटरचा फायदा याभागातील रुग्णांना होणार असल्याने ग्रामीण भागात तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी या व्हेंटिलेटरचा फायदा होईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.