महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ सप्टेंबर । जर तुमच्या नवीन कारसाठी व्हीआयपी नंबरप्लेट क्रमांक हवा असेल तर तुम्हाला त्यासाठी तगडी रक्कम मोजावी लागणार आहे. राज्य परिवहन विभागाने नवीन नोंदणीकृत वाहनांसाठीच्या शुल्कात वाढ करण्याचे परिपत्रकच काढले आहे. येत्या 14 ऑक्टोबर 2022 पूर्वी नागरिकांना यासंदर्भात सूचना आणि हरकती सादर करण्यास सांगितले असल्याचे आरटीओ अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
कारसाठी 0001 या क्रमाकासाठी यापुढे पाच लाख रुपयांची फोडणी बसणार आहे. याआधी यासाठी तीन लाख रुपये मोजावे लागत होते. नव्या मसुद्यानुसार तर दुचाकी आणि तिचाकींसाठी पन्नास हजार रुपयांऐवजी एक लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, नाशिक या जिह्यासाठी कारच्या व्हीआयपी नंबरसाठी सहा लाख रुपये मोजावे लागणार आहेत. भाग्यवान किंवा लकी असणारे क्रमांक जादा पैसे भरून कारच्या नंबरप्लेटसाठी वाहनचालक घेत असतात. दुचाकीचा नंबर जर कारसाठी वापरायचा असेल तर सीरिज जम्पिंग असे संबोधले जात असून त्यास 15 लाखाहून अधिक रक्कम फी म्हणून आकारली जाते.