सणासुदीला मिळणार मोठा दिलासा ; खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० सप्टेंबर । देशातील सर्वांत मोठा खाद्यतेल वापरकर्ता व आयातदार असलेल्या भारतातील खाद्यतेल स्थिती झपाट्याने दिलाशाकडे जात आहे. स्वदेशी तेलबिया मोठ्या प्रमाणात बाजारात आल्या आहेत. त्यामुळे मागील महिन्यापर्यंत उच्चांकावर गेलेले खाद्यतेलाचे दर येत्या काळात कमी होण्याची आशा निर्माण झाली आहे.

भारत हा जगातील सर्वांत मोठा खाद्यतेल आयातदार देश आहे. देशाच्या एकूण आयातीपैकी ६५ टक्के आयात पामतेलाची असते. हे पामतेल तयार किंवा कच्च्या स्वरूपात आयात केले जाते. कच्चे पाम फळ आयात करून त्यापासून तेल काढण्याचा आकडा अधिक असतो. भारतात पामतेलापाठोपाठ सूर्यफूल तेलाची आवक होते. यातील ६० टक्के युक्रेनहून, तर ४० टक्के तेल रशियाहून आयात केले जाते. युद्धानंतर आता रशियाहून आयात हळूहळू सुरळीत होत आहे. अशी सर्व स्थिती असताना सध्या स्वदेशी खाद्यतेल स्थितीदेखील सुधारत आहे.

अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, भारतात सोयाबीन तेलाची मागणी मोठी असते. या तेलबिया प्रामुख्याने भारतातच तयार होतात. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत देशात १.९० लाख पोती (१.९० कोटी किलो) सोयाबीन बाजारात आले आहे. सोयाबीनमध्ये फक्त २० टक्के तेल असते. त्यानुसार सध्याच्या १.९० कोटी किलो सोयाबीनपासून ३८ लाख किलो तेल तयार होईल. भारतात मोहरीच्या तेलालादेखील मोठी मागणी असते. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातील बाजारपेठांमध्ये २.१५ लाख पोती (२.१५ कोटी किलो) मोहरीच्या तेलबिया आल्या आहेत. मोहरीच्या तेलबियातून सरासरी ४० टक्के तेल निघते. त्यानुसार सुमारे ८६ लाख किलो तेल बाजारात आगामी काळात येणार असून हे चांगले संकेत आहेत, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.

देशात दरवर्षी सुमारे २.५० कोटी किलो खाद्यतेलाची मागणी असते. सध्या बाजारात आलेल्या स्वदेशी तेलबियांनुसार सुमारे १.२४ कोटी खाद्यतेल तयार होईल, अशी स्थिती आहे. तर यावर्षी जुलैमध्ये तयार पामतेलाची आयातदेखील ४३ हजार ५५५ टनांवर गेली. हा आकडा मागील जुलैमध्ये फक्त १३ हजार ८९५ टन इतका होता, तर कच्च्या पामची आयात ४.८० लाख टन होती. हा आकडा मागील वर्षी जुलैममध्ये ४.५१ लाख टन होता. याखेरीज जुलैमध्ये देशाने एकूण १२.०५ लाख टन खाद्यतेलाची आयात केली. हा आकडा त्याआधी अर्थात जूनमध्ये ९.४१ लाख टन, तर जुलै २०२१मध्ये ९.१७ लाख टन इतका होता. यामुळेच येत्या काळात खाद्यतेल दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *