धनुष्यबाण मिळवण्यासाठी निवडणूक आयोगासमोर परेड? ; मुख्यमंत्री शिंदे सहकारी मंत्र्यांसोबत दिल्ली दौऱ्यावर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ सप्टेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदारांच्या गटासोबत दिल्लीला जाणार आहेत. जीएसटी बैठकीसाठी ते जाणार असल्याचा दुजोरा शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे दिल्लीत दाखल होणार आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने सत्तारूढ व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाराष्ट्रातील संभाव्य प्रकल्पांबाबत केंद्रीय रेल्वे, माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी यावेळी चर्चा करणार आहेत. तसेच राज्यातील समृद्धी महामार्ग व इतर महामार्गांच्या कामांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

काही खासदार, आमदारांचीही हजेरी
आमदारांसोबतच शिंदे गटाचे काही खासदार देखील दिल्लीला जाणार आहेत. हे आमदार व खासदार खरी शिवसेना असल्याचे आणखी काही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर करणार असल्याचे समजते. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणत्या गटाकडे राहील, हे प्रकरण निवडणूक आयोगापुढे आहे.

शिंदे गट दिल्लीवारीसाठी सज्ज
तत्पूर्वी आमदारांचे समर्थन लेखी पत्राद्वारे नको, धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवायचे असेल तर समर्थन असलेल्या आमदारांनाच हजर करा असे म्हणणे निवडणूक आयोगाचे आहे, त्यामुळेच आता शिंदे गट दिल्लीवारीसाठी सज्ज झाला आहे.

‘जीएसटी’बैठकीसाठी दिल्लीत
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार असल्याचा दुजोरा दिला, पण ते जीएसटी बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत त्यांच्यासोबत काही आमदारही सोबत असतील. परंतु एकनाथ शिंदे आणि आमदार निवडणूक आयोगासमोर आमदार हजर करणार असल्याबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला.

निवडणूक आयोगासमोर परेड
खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन निवडणूक आयोगासमोर हजर राहणार आहेत. त्यांच्यासोबत मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे हे असतील, परंतु अजून कोण-कोण आमदार त्यांच्यासोबत असतील याचा निश्चित आकडा स्पष्ट झाला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *