“चूक झाली, रश्मी ठाकरेंबद्दल तसे बोलायला नको होते, शब्द मागे घेतो”; रामदास कदमांची कबुली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि . २१ सप्टेंबर । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. यातच दिवसेंदिवस शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष वाढताना दिसत आहे. शिंदे गट समर्थक रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहे. रश्मी ठाकरेंबद्दल तसे बोलायला नको होते. अनावधानाने तसे बोलले गेले. ते शब्द मागे घेतो, असे सांगत रामदास कदम यांनी त्या विधानावरून माघार घेतली आहे.

दापोली येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेसह ठाकरे कुटुंबीयांवर घणाघाती टीका केली. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आले. यावर आता खुद्द रामदास कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रश्मी ठाकरेंबद्दल तसे बोलायला नको होते, मी माझे शब्द मागे घेतो. अनवधानाने बोलून गेलो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा दावा रामदास कदमांनी केला.

माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, मी वास्तव ते बोललो, ठाकरेंचा अपमान होईल असे काही बोललो नाही, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या लग्नाविषयी केलेल्या विधानावर रामदास कदम ठाम असून, त्यात चुकीचे काहीच बोललो नाही. लग्न करून दोन-तीन मुले झाल्यानंतर आदित्य ठाकरेंना संसारी माणसांच्या व्यथा समजू शकतील, असे म्हटले होते. त्यात गैर काहीच नाही, असे रामदास कदम यांनी स्पष्ट केले. सुषमा अंधारे कोण? मी ओळखत नाही, असा टोला लगावताना आंदोलनांना मी घाबरत नाही, असा इशाराही कदम यांनी दिला. ते टीव्ही९शी बोलत होते.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे वारंवार मी बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे, असे सांगत असतात. अरे पण ही गोष्ट किती वेळा सांगायची. तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहात, याबाबत संशय आहे का? तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र नाहीत, असे आम्ही म्हटले आहे का? मग तुम्हाला हे वारंवार का सांगावे लागत आहे? तुमच्यात स्वत:मध्ये काही कर्तृत्व आहे की नाही? असा सवाल रामदास कदम यांनी केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *