बाळासाहेब ठाकरेंचा ‘थापा’ एकनाथ शिंदेंना जाऊन का मिळाला? थापा स्पष्टच म्हणाले…

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ सप्टेंबर । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सहाय्यक आणि निकटवर्ती चंपासिंह थापा यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला होता. थापा यांनी प्रदीर्घ काळ मातोश्रीवर राहून बाळासाहेबांची सेवा केली होती. या काळात ते सावलीसारखे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत वावरायचे. त्यामुळे चंपासिंह थापा (Champa Singh Thapa) यांचा शिंदे गटातील प्रवेश अनेकांसाठी धक्कादायक ठरला होता. मात्र, चंपासिंह थापा यांनी आपण शिंदे गटात का आलो, याचे कारण स्पष्ट केले आहे. मला बाळासाहेब ठाकरे (Balasheb Thackeray) यांचे विचार पटतात. तसंच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेही विचार पटतात. आपल्या मनाने जो कौल दिला तो मी मान्य केला आणि मी शिंदे गटात आलो, असे चंपासिंह थापा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

नवरात्रीचा पहिला दिवस अत्यंत शुभ आहे. त्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो. ठाण्यातील टेंभी नाका देवीचं दर्शन घेतलं. आता मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करणार आहे. शिंदे साहेब जे आदेश देतील, ते पाळणार, असेही थापा यांनी म्हटले होते.

गेल्या काही काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मनोहर जोशी, लीलाधर डाके, गजानन किर्तीकर या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्या माध्यमातून शिंदे यांनी शिवसेनेतील या बुजुर्गांना आपल्या गटात खेचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा होती. परंतु, तुर्तास तरी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेल्या या ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याच बाजूला राहणे पसंत केले आहे. त्यामुळे जुन्या शिवसैनिकांशी भावनिक नाळ जोडलेल्या या नेत्यांना आपल्या गटात आणण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीप्रमाणे वावरणारे चंपासिंह थापा गळाला लागल्याने शिंदे गटाचा हुरूप थोडासा का होईन वाढला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत राहिलेल्या चंपासिंह थापा यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. मातोश्रीवर थापा यांचं ‘वजन’ असल्याचंही बोललं जातं. ठाकरे कुटुंबासाठी हा मोठा धक्का मानला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *