मुख्यमंत्री एकनाथ शिंदें दसरा मेळाव्यात आणखी एक ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार ? कोण सोडणार ठाकरेंची साथ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ सप्टेंबर । दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. याचाच भाग म्हणून शिंदे गटाची दसरा मेळाव्याच्या पूर्व तयारीची बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहे, त्याचा आढावा घेण्यासाठी वानखेडे स्टेडियमजवळील गरवारे क्लबमध्ये ही बैठक घेण्यात आली. या बैठकीवेळी एकनाथ शिंदे यांनी काल सुप्रीम कोर्टात लागलेल्या निकालाबद्दल आनंद व्यक्त केला. ‘कालचा निकाल आपल्यातला उत्साह वाढवणारा आहे. या निकालामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. आता आपण दसरा मेळावा उत्साहात साजरा करायचा आहे. त्यासाठी साधारणत: अडीच ते तीन लाख लोक येण्याची शक्यता आहे,’ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

‘दसरा मेळाव्यासाठी येणाऱ्या गाड्यांसाठी दहा मैदानं बूक केली आहेत. अनेक जण आपल्यासोबत येण्यास इच्छुक आहेत, त्यामुळे अनेकांचे प्रवेश दसरा मेळाव्यात होतील,’ असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

‘दसरा मेळाव्यासाठी जे कार्यकर्ते येतील त्यांच्या जेवणाची, पाण्याची आणि वॉशरूमची व्यवस्था नीट झाली पाहिजे. हे कार्यकर्ते आपल्यासाठी येत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,’ अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी नेत्यांना दिल्या आहेत.

दरम्यान सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून 25 हजारहून अधिक शिवसैनिक मुंबईच्या बीकेसी मैदानावर आयोजित दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. यासाठी 350 बसेसचे नियोजन झाले असून मतदारसंघातून 500 बसेसची मागणी होत असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले.

शिवसेना नेते रामदास कदम यांनी या बैठकीनंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. ‘हा दसरा मेळावा शिवसेना प्रमुखांच्या परंपरेला साजेसा होईल. सबंध देशाचं लक्ष या मेळाव्याकडे लागलं आहे. गर्दीचं नियोजन केलं जाईल, शक्तीप्रदर्शनाची आवश्यकता नाही. शिवेसना कुणाची हा निर्णय न्यायालयात लागण्याआधीच दसऱ्याला लागेल. ताकद असती तर 50 आमदार आणि खासदार सोडून गेले नसते. आता भाड्याने राष्ट्रवादीतन आलेल्यांना नेते-उपनेते करून आमच्या अंगावर सोडलं जात आहे,’ असा टोला रामदास कदम यांनी हाणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *