पीएफआय चे बंदीमुळे बँक खाते गोठवणार : कार्यक्रमांना पैसा देणाऱ्या स्रोतांची कसून चौकशी होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ सप्टेंबर । मागील काही दिवसांमध्ये देशविरोधी कारवायांचा आरोप ठेवून अटक करण्यात आलेल्या तरुणांकडून पीएफआय संघटनेच्या पैशांच्या स्रोतांची चौकशी सुरू झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी शहरातून चार तर जालन्यातून एकाला तपास यंत्रणेने अटक केली. सध्या त्यांची पोलिस कोठडीत चाैकशी सुरू आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमांना पैसा कुणी पुरवला, खर्च, व्यवहार कसा पार पडला, याचा तपास सुरू आहे.

२२ सप्टेंबर रोजी तपास यंत्रणेने शहरातून शेख इरफान शेख सलीम ऊर्फ मौलाना इरफान मिल्ली (३७, रा. किराडपुरा), सय्यद फैजल सय्यद खलील (२८, रा. रोजेबाग), परवेज खान मुजम्मील खान (२९, रा. बायजीपुरा), अब्दुल हादी अब्दुल रऊफ (३२, रा. जालना), नासेर साबेर शेख (३७, रा. बायजीपुरा) यांना अटक केली. त्यानंतर औरंगाबादसह मराठवाड्यात संघटनेचे पसरलेले मोठे नेटवर्क या कारवाईतून समोर आले. औरंगाबादेतून सर्वाधिक पाच जणांना अटक करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे तपास यंत्रणेने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईत १४ जणांना नोटिसा देण्यात आल्या. त्यादरम्यानही औरंगाबादेत संघटनेचे सर्वाधिक मोठे जाळे पसरल्याचे समोर आले.

सर्वप्रथम २०२० मध्ये पीएफआय तपास यंत्रणांच्या रडारवर आली. डिसेंबर महिन्यात ईडीने टाकलेल्या छाप्यामध्ये त्यांना मराठवाड्यात संघटनेने केलेल्या अनेक कामांची माहिती मिळाली. त्यासंदर्भात ४०० च्या वर कागदपत्रे हाती लागली. त्यानंतर काही महिन्यांतच त्यांचे प्रमुख बँक खाते गोठवले गेेले. परंतु आता तपास यंत्रणेने देशविरोधी कारवायांचा ठपका ठेवून अटक केलेल्या पाच जणांकडून पैशांच्या मुख्य स्रोतांची चौकशी सुरू आहे.

गेल्या दीड वर्षामध्ये १३ पेक्षा अधिक कार्यक्रम झाल्याचे तरुणांच्या चौकशीतून समोर आले. त्यापैकी २०२१ मध्ये पाच झाले. खाते सील केल्याच्या निषेधार्थ आंदोलनासह १५ मार्च राेजी ‘सेव्ह द रिपब्लिक’ नावाने आंदोलन पुकारले होेते. इतर नोंदींमध्ये २६ जानेवारी रोजी कार्यालयावर ध्वजारोहण केले होते. १६ फेब्रुवारी रोजी स्थापना दिन साजरा केला, तर कोरोनाच्या दोन वर्षांमध्ये सातत्याने अन्नदान, रक्तदान शिबिरे घेतली.

संघटनेचे बहुतांश समर्थक अत्यल्प उत्पन्न असलेले : संघटनेच्या आर्थिक स्रोतांची चौकशी सुरू असली तरी बहुतांश सदस्य, समर्थक मात्र अत्यल्प उत्पन्न गटातील तरुण आहेत. प्रामुख्याने किराणा दुकान व्यावसायिक, कपडे विक्रेता, पीओपी कारागीर, मिस्त्री कामगार, किचन ट्रॉली कारागीर, अरबी शिक्षक, मार्केटिंगचे काम करणारे तरुण असल्याचे प्राथमिक चाैकशीत स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *