महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ४ ऑक्टोबर | ७ मे पासून सुरू असलेला पाऊस ऑक्टोबरमध्येही धो-धो बरसत असल्याने, यंदा ऑक्टोबर हिटचे चटके बसणारच नसल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. राज्यातील बहुतांश भागात पाऊस अजूनही जोरदार बरसत आहे. समाधानाची बाब म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होणार असून, ८ ऑक्टोबरपासून मान्सून राज्यातून निरोप घेणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना निरोपाचा असल्याने, ‘ऑक्टोर हिट’ अनुभवयास मिळणार नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
यंदा निसर्गाचे चक्र फिरल्याने, पावसाने तब्बल पाच महिने राज्यात हजेरी लावली असून, सहाव्या म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातही पाऊस कायम राहणार आहे. पावसाने राज्यभरात धुमाकुळ घातल्याने, नद्या, नाले पात्राबाहेर वाहू लागल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने, अनेकजण बेघर झाले आहेत.
राज्यात ओला दुष्काळसदृश्य स्थिती असून, पावसाने आता परतावे अशी प्रत्येकजण अपेक्षा धरून आहे. ऑक्टोबर महिना उजाडल्याने पाऊस परतून ‘हिट’ अनुभवयास मिळेल, असे अनेकजण आस लावून आहेत. मात्र, ऑक्टोबरमध्येही पावसाच्या धारा कायम राहणार असल्याने, घामाच्या धारा निघणारच नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. ऑक्टोबरमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. ७ ऑक्टोबरपासून राज्यात स्थिर हवामान होणार असले तरी, पावसाच्या परतीचा प्रवास पुढील १५ दिवस राहण्याची शक्यता असून, अनेक भागात पावसाचा कहरही बघावयास मिळू शकणार, असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.
अशी जाणवते ‘ऑक्टोबर हिट’
नैऋत्य मान्सूनच्या परतीनंतर आकाश निरभ्र होत असल्याने, तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. माती ओलसर असते, दिवसा उष्ण आणि दमट हवामान, रात्री थंडी. परतीच्या पावसामुळे आर्द्रता कमी होते. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सूर्य दक्षिणेकडे सरकतो, ज्यामुळे कमी दाबाचा पट्टा कमकुवत होतो आणि उष्णतेचे चटके बसतात. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये सूर्य दक्षिणेकडे सरकतो. त्यामुळे उत्तरेकडील मैदानांवर कमी दाबाचा पट्टा कमकुवत होवून ऑक्टोबर हिट जाणवते.