Pune Metro: दक्षिण पुण्याचा धडधडता श्वास! कोंढवा–येवलेवाडीपर्यंत मेट्रोची धाव, २० किमी उन्नत मार्गिकेचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ मार्च २०२६ ।।पुणेकरांच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या वाहतूक कोंडीला अखेर शिस्त लावण्याची वेळ आली आहे, असा आशावाद निर्माण करणारी बातमी समोर आली आहे. दक्षिण पुण्यातील कोंढवा आणि येवलेवाडी परिसराला थेट मेट्रोसेवेने जोडण्याचा २० किलोमीटर लांबीचा उन्नत मार्गिकेचा प्रस्ताव आकार घेत आहे. शिवाजीनगरपासून जिल्हाधिकारी कार्यालय, कॅम्प, पुलगेटमार्गे कोंढवा आणि पुढे येवलेवाडीपर्यंत मेट्रो धावेल, अशी रूपरेषा आखण्यात येत आहे. सर्व सर्वेक्षणे, मंजुऱ्या आणि शासकीय शिक्कामोर्तब वेळेत पूर्ण झाले, तर २०३०-३१ पर्यंत ही मार्गिका प्रत्यक्षात उतरेल, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहराच्या वाढत्या पसाऱ्यात दक्षिण भाग बराच काळ ‘प्रतीक्षायादी’त होता; आता त्या प्रतीक्षेला गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

हा विस्तार हिंजवडी–शिवाजीनगर या सुमारे २३ किमी लांबीच्या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा भाग मानला जात आहे. हिंजवडी–शिवाजीनगर मार्ग सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभा राहत असताना, कोंढवा–येवलेवाडी मार्ग थेट महामेट्रोकडून उभारला जाणार आहे. या मुख्य मार्गाला ज्योती चौक ते एनआयबीएम जंक्शन आणि पुढे उंड्रीपर्यंत स्पर लाइन जोडण्याचाही प्रस्ताव आहे. दर एक किलोमीटरवर स्थानके उभारण्याचे प्राथमिक नियोजन असल्याने परिसरातील दाट वसाहतींना मोठा दिलासा मिळू शकतो. सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती झाली असून क्षेत्र सर्वेक्षण सुरू आहे. आराखडा मे-जूनपर्यंत तयार होऊन पुढील प्रक्रियेसाठी राज्य व केंद्र सरकारकडे सादर होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.

कोंढवा परिसरात मेट्रोअभावी नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीत अडकून वेळ आणि इंधनाचा अपव्यय सहन करावा लागतो. हडपसरपर्यंत मेट्रोला मंजुरी मिळाली असली, तरी दक्षिण टोकाला राहणाऱ्यांची ‘कनेक्टिव्हिटी’ अधांतरीच राहिली होती. गेल्या वर्षी खडकवासला–हडपसर–स्वारगेट–खराडी या नव्या मार्गिकेला राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पूर्व–पश्चिम दुवा मजबूत करण्याची दिशा ठरली; आता दक्षिण दुव्याची पाळेमुळे घट्ट करण्याची वेळ आली आहे. मेट्रो म्हणजे केवळ लोहमार्ग नव्हे, तर शहराच्या विकासाचा कणा असतो. तो कणा दक्षिण पुण्याला लाभला, तर केवळ प्रवास सुखकर होणार नाही, तर आर्थिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक हालचालींनाही नवी चालना मिळेल. मात्र, प्रस्तावाच्या कागदांना प्रत्यक्ष रुळांचे रूप कधी मिळते, याकडे पुणेकरांचे डोळे लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *