महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .३० सप्टेंबर । काल (शुक्रवार) सायंकाळी पावसाने राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडाली. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने रस्त्यावर पाणी आले होते. यामुळे शहरातील भागांत वाहतुककोंडी झाली होती. तर येणाऱ्या चार दिवसांत मध्यम सरींचा अंदाज असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून ५ ते १० ऑक्टोबर दरम्यान मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली असून याचवेळी पावसाकडून राज्यातील मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासहित अनेक ठिकाणी जोरदार बॅटिंग करण्यात येत आहे. तर दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.
पुढील चार दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती हवामान खात्याचे माजी अधिकारी माणिक खुळे यांनी दिली.
शनिवारी (ता. ३०) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर, मराठवाडा आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, बीड, पुणे, धुळे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, सांगली या जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.