महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -पुणे – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे -पुणे शहरासह उपनगर भागात शुक्रवारी दुपारी 4 वाजेनंतर जोरदार अवकाळी पाऊस झाला. गुरुवारीही शहरातील काही भागात पाऊस झाला होता. त्यातच आज दुपारी पुन्हा अवकाळी सरी कोसळल्या आहेत. यावेळी शिवाजीनगर भागात गारांचा पाऊस झाल्याचीही माहिती आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस शहर व ग्रामीण भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता. वेधशाळेचा अंदाज खरा ठरला असून शहरातील विविध पेठांसह कोथरूड, हडपसर, कोंढवा, बिबवेवाडी या उपनगर भागातही पावसाने हजेरी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणावर विजांच्या कडकडाट पाऊस जोरदार बरसला. पुण्यात सिंहगड रस्ता, बुधवार पेठ, हडपसर, कोथरूड, शिवाजीनगर, कात्रज, वारजे भागात तर ग्रामीण भागात मुळाशी, भूगाव, बावधन पट्ट्यात पावसाने हजेरी लावली.
मुसळधार पाऊस व सुसाट वारा यामुळे संपूर्ण शहराच्या विविध भागात किमान 50 ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनांची अग्निशमन दलाकडे नोंद झाली आहे. तर मंगळवार पेठ येथे इमारतीवरील मोठा टॉवर व शिवाजीनगर येथे होर्डिंग्स पडल्याची माहिती आहे. सुदैवाने या घटनांमध्ये जखमी कुणीही जखमी नाही.