महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – नाशिक – विशेष प्रतिनिधी – कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मालेगावात हाहाकार उडाला आहे. सरासरी एका तासाला 4 कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासन हादरलं आहे. मात्र, याच मालेगावातून शुक्रवारी एक दिलासादायक माहिती आली आहे. ती म्हणजे, मालेगावात 13 रुग्णांनी कोरोनाशी दोन हात करत त्याच्या पराभव केला आहे.
कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या या रुग्णांना हॉस्पिटलमधून सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. या अगोदर 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. एका आठवड्यात 20 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. कोरोनावर मात करता येते. त्यामुळे घाबरू नका, उपचारासाठी पुढे या, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
दुसरीकडे, मालेगावात कोरोनाचं संकट कायम आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकट्या मालेगावात गुरुवारी 82 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यात 3 महिन्यांची बालिका, 2 वर्षांचा मुलगा आणि 13 पोलिसांचा कोरोनाबाधित रुग्णांमध्ये समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 274 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कठोर निर्देश दिले आहेत.
मालेगावात अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी हॉस्पिटल्स आणि डॉक्टरांनी आपली प्रॅक्टिस सुरू करावी. प्रशासन मदत करणार करावी. कारवाई करण्याची वेळ आणू नका, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्येही नॉन कोविड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.