महागाईने ; दिवाळीच्या तोंडावर सगळ्याच वस्तूंची दरवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ ऑक्टोबर । गणेशोत्सव, नवरात्र यापाठोपाठ दिवाळीही जल्लोष आणि उत्साहात साजरी करण्याच्या प्रयत्नांन असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे महागाईने खिसे रिकामे होऊ लागले आहेत. दिवाळी आठ दिवसांवर आली असताना शनिवारची सुट्टी साधून बाजारपेठांमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांना या महागाईचा चांगलाच फटका बसला आहे. डाळी, धान्य, फराळासाठी लागणारे साहित्य, भाज्या, तेल या सगळ्यांचे भाव चढे असल्याने दिवाळीचा गोडवा महाग होत आहे.

करोना संकटाने दोन वर्षे चिंतेत गेल्यानंतर यंदाचे उत्सव उत्साही वातावरणात साजरे होत आहेत. हाच उत्साह खरेदीमध्येही कायम असल्याचे दिसले. पुढील शनिवारी, २२ ऑक्टोबरला धनत्रयोदशीसह दिवाळीचा पहिला दिवस असेल. त्यामुळेच या आठवड्याचा शनिवार हा ग्राहकांसाठी खरेदीवार ठरला. परिणामी क्रॉफर्ड मार्केट, दादर, वांद्रे लिंक रोड, अंधेरी लोखंडवाला, कुर्ला अशा महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गर्दी दिसली. आज, रविवारी आणखी गर्दी अपेक्षित आहे. या गर्दीला वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागले.

दुधाच्या दराला उकळी

-अलिकडेच दूध कंपन्यांनी २ रुपये प्रतिलिटरची वाढ केली. त्यामुळे सर्वच कंपन्यांचे साधे दूध किमान ५२ रुपये प्रतिलिटरने घ्यावे लागत आहे. तर चांगल्या प्रतीचे दूध ६४ ते ७२ रुपये प्रति लिटर आहे.

-याचा परिणाम मिठाईच्या दरांवरही होत आहे. दूध व साखर, दोन्ही महागल्याने मिठाईची दरवाढ निश्चित आहे.

भाज्यांसाठी अधिक पैसे

-भाज्यांच्या दरानेही सामान्य नागरिकांना मेटाकुटीला आणले आहे.

-४० रुपये प्रतिकिलो असलेले टोमॅटो सध्या ६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत.

-बटाटे व कांद्याच्या दरांतही सरासरी २० टक्के वाढ झाली आहे.

-सर्वच भाज्या किमान ८० रुपये प्रतिकिलोहून अधिक दराने विक्रीस आहेत.

कपड्यांची खरेदी सर्वाधिक

शनिवारी कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र बाजारात दिसले. घरातील आबालवृद्धांची हौस पूर्ण करण्यासाठी कापड खरेदीला प्राधान्य दिसले. यात प्रामुख्याने क्रॉफर्ड मार्केट, दादर व वांद्रे-लिंकींग रोडवरील कपडे बाजारात गर्दी होती. ठाण्याच्या बाजारपेठाही खरेदीसाठी झालेल्या गर्दीने फुलल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *