महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० ऑक्टोबर । महागाई वाढत आहे आणि त्याच दरम्यान एक महत्त्वाची बातमी येत आहे. आजकाल स्मार्टफोन म्हणजे जीव की प्राण अशी स्थिती आहे. अगदी महत्त्वाच्या डॉक्युमेंटुपासून ऑफिसपर्यंत आणि पेमेंट पासून बँकेंच्या सेवांपर्यंत सगळी कामं एका फोनवर येतात. हाच स्मार्टफोन जर तुम्ही बदलण्याचा किंवा नवीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयात सातत्याने होत असलेल्या घसरणीचा परिणाम मागणीवर होत आहे. यामुळे यंदा स्मार्टफोनची शिपमेंटही कमी होऊ शकते.
उद्योग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात मागणी वाढवण्यासाठी स्मार्टफोन ब्रॅण्ड्स स्वत: आयातीचे दर स्वत: काहीवेळा आपल्या नफ्यातून भरतात. आता त्यांना या खर्चाचा भार ग्राहकांवर टाकावा लागणार आहे.
या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत स्मार्टफोनची सरासरी किंमत 20 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, जी एप्रिल-जूनमध्ये 17 हजार रुपये होती. रुपयातील घसरणीचा खर्चावर नक्कीच परिणाम होईल, असे मोबाइल फोन कंपनीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार डॉलरमधील चढ उतार हा थेट आयातीवर परिणाम करणारा ठरतो. रुपयाचं मूल्य घसरलं आणि डॉलर मजबूत झाला तर आयात करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. किंमतीतील वाढीचा परिणाम वार्षिक आधारावर विक्रीवरही होऊ शकतो. सणासुदीच्या काळानंतर त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होणार आहे.
केंद्र सरकार पाम तेलावरील शुल्क देखील वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. भारतात मोठ्या प्रमाणात पाम तेल आयात केलं जातं. शेतकऱ्यांना मदतीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा निर्णय घेण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.