महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ ऑक्टोबर । युट्यूब व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला युट्यूब व्हिडीओचे 4K व्हिडीओ निशुल्क पाहता येणार आहे. यासाठी तुम्हाला आता प्रीमियम सबस्क्रिप्शन घ्यावे लागणार नाही. याआधी केवळ प्रीमियम यूजर्सनाच यूट्यूबवर 4K व्हिडीओ पाहण्याची सुविधा मिळत होती. युट्यूबने अलीकडेच 4K व्हिडीओ स्ट्रीमिंगला प्रीमियम श्रेणीत हलवले. युट्यूबच्या या निर्णयावर सोशल मीडियावरही जोरदार टीका झाली होती, त्यानंतर कंपनीने आपला निर्णय बदलला असून युट्यूब वापरकर्ते आता प्रीमियम सबस्क्रिप्शनशिवाय 4K व्हिडिओ पाहू शकतात, अशी अधिकृत घोषणा केली आहे.
युट्यूबने 4K व्हिडीओ स्ट्रीमिंगसाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन खरेदी करण्याबाबत सर्वेक्षण केले होते. ज्यानंतर वापरकर्त्यांनी याला जोरदार विरोध केला होता. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कंपनीने 4K व्हिडीओ स्ट्रीमिंगचा प्रयोग थांबवला आहे.
तसेच, युट्यूब लवकरच युजर्ससाठी अकाउंट हँडल फीचर जारी करणार आहे. या फीचरमध्ये, इंस्टाग्राम, ट्विटर आणि टिकटाॅक सारख्या प्लॅटफॉर्मप्रमाणे, वापरकर्त्याचे स्वतःचे खाते हँडल असेल, ज्याच्या मदतीने वापरकर्ते इतर कोणत्याही वापरकर्त्याचा उल्लेख करू शकतील. गुगलच्या मालकीच्या कंपनीच्या या वैशिष्ट्याची सध्या चाचणी सुरू असून लवकरच युजर्ससाठी ते आणले जाणार आहे.