शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, या सात नावांची चर्चा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ ऑक्टोबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लवकरच होणार असल्याची माहिती आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याच्या चिन्हं आहेत. यामध्ये शिंदे गटातील चार आमदारांना, तर भाजपच्या चार आमदारांना मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षातून कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता. पहिल्या विस्तारात संधी हुकलेले आणि नाराजीच्या चर्चा असलेले आमदार संजय शिरसाट यांना मंत्रिपद नक्की समजले जात आहे. याशिवाय भरत गोगावले, सदा सरवणकर, प्रकाश आबीटकर, बालाजी किणीकर, योगेश कदम यांचीही नावं चर्चेत आहेत.

ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाची धुरा सांभाळलेले आणि शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनाही मंत्रिपद मिळणं फिक्स मानलं जात आहे. मंत्रिपद न मिळाल्याने बच्चू कडू आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या शपथविधीनंतर जवळपास सव्वा महिन्यांनी पहिला कॅबिनेट विस्तार झाला होता. त्यानंतर आता आणखी अडीच महिने उलटल्याने दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची आमदारांना प्रतीक्षा आहे. १९ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्यामुळे पुढच्या १५ ते २० दिवसात विस्ताराची अपेक्षा आहे. दुसऱ्या टप्प्यात कॅबिनेटबरोबरच राज्यमंत्रीपदेही भरण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपमधून कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भारतीय जनता पक्षातून मंत्रिपदाच्या शर्यतीत कोण आहे, या नावांची चर्चा सुरु झालेली नाही. भाजपातही अनेक इच्छुक असले, तरी तूर्तास सर्वच जण वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *