![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ नोव्हेंबर । हिमाचल प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मतदानाचा हक्क बजावण्याऐवजी सुट्टी एन्जॉय करण्यात अनेकांना मौज वाटते. मतदान करणं आपलं राष्ट्रीय कर्तव्य आणि मोठी जबाबदारी आहे, हे कळत नाही. हिमाचल प्रदेशमधल्या १०६ वर्षांच्या आजोबांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्येसुद्धा ‘मतदाना’चाच विचार केला.
हिमाचल प्रदेशमधल्या ऊना येथील बीरु राम यांनी गुरुवारी रात्री पोस्ट बॅलेटच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर अवघ्या दोन तासांमध्ये या १०६ वर्षांच्या आजोबांचा मृत्यू झाला. एका अधिकृत प्रवक्याने आज ही माहिती दिली आहे.
बीरु राम यांनी विधानसभा निवडणुकीसाठी बनवलेल्या मोबाईल बूथच्या माध्यमातून मतदान केलं. त्यानंतर दोनच तासांमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बीरु यांच्यामागे तीन मुलं, एक मुलगी आणि परिवार आहे. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हिमाचल प्रदेशमध्ये काल पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून ७ हजार ८०० लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. फतेहपूर मतदारसंघातील जगनोली गावामधील बंटो देवी या १०६ वर्षीय वृद्धेनेसुद्धा घरातूनच बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक विभागाच्या टीमने त्यांच्या घरी जात गोपनीय मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.