![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ नोव्हेंबर । ईशान्य मोसमी पावसामुळं दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक राज्यात पाऊस पडत असल्यामुळं शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. या राज्यांमध्ये दोन दिवस शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
सात नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुचुदेरी, कराईकल, केरळमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.उत्तर भारतातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यामध्ये जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. या राज्यात पाच ते सात नोव्हेंबरदरम्यान पावासाचा अंदाज आहे.उत्तराखंडमध्ये सहा आणि सात नोव्हेंबरला बर्फवृष्टीसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं तिथे वातावरणात गारवा जाणवत आहे.
पावसामुळं तामिळनाडूमधील, कांचीपुरम जिल्ह्यातील तंजावर, तिरुवरूर मायिलादुथुराई, नागापट्टिनम, कुंद्रथूर इथे शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.चेन्नईतील महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चेन्नईमध्ये आठ नोव्हेंबरपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात गारठा वाढला आहे.दक्षिण भारतात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
