महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १० नोव्हेंबर । हिवाळा सुरू झाला असून गोड गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. आता या थंडीचा कडाका राज्यात आणखी वाढणार आहे. राज्यभरातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान आणखी कमी होऊ लागल्याने राज्यात थंडीचे प्रमाण आणखी वाढल्याचे पाहायला मिळणार आहे.
राज्यात परिस्थिती पाहता मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील किमान तापमानाने खाली उतरले आहे. तर विदर्भात किमान तापमानाचा पारा अजून स्थिर आहे. मात्र, रविवारपर्यंत राज्यात किमान तापमान 3 अंशाने कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील दोन दिवस पहाटेच्या किमान तापमानात विशेष फरक जाणवणार नाही. पण उद्या 11 नोव्हेंबरपासून पुढील 3 दिवस म्हणजे रविवारपर्यंत किमान तापमानात 3 अंशांपर्यंत घसरण होईल, असे सांगण्यात आले आहे. तर राज्यातील बऱ्याचशा भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र, तरी पावसाची शक्यता नाही.
तसेच यामुळे सध्यापेक्षा थंडी आणखी जाणवणार आहे. राज्यात विशेषत: खान्देशात थंडीचा प्रभाव अधिक राहणार आहे. तर दुपारच्या सध्याच्या कमाल तापमानात सरासरी 2 अशांच्या फरकामुळे राज्यात दुपारचे तापमान ऊबदार जाणवणार, अशी माहिती हवामान खात्याचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
थंडीमध्ये लागणाऱ्या उबदार कपड्यांनी बाजारपेठा सजल्या –
हिवाळा सुरू झाला असून गोड गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली आहे. पुण्यामध्ये सुद्धा थंडीचा कडाका वाढला आहे. या थंडीच्या निमित्ताने पुण्यातील सर्व बाजारपेठा उबदार कपड्यांनी मोठ्या प्रमाणावर सजल्या आहेत. पूर्वी थंडी म्हटलं की स्वेटर, शॉल, मफलर एवढीच थंडीचे कपडे घेण्याची पद्धत होती. मात्र, आता थंडीमध्ये लागणाऱ्या उबदार कपड्यांमध्ये विविध फॅशनचे कपडे देखील बाजारपेठेमध्ये आलेले आहेत.
फॅशनचा आणि महिलांचा फारच जिव्हाळ्याचा विषय असतो. यावर्षी महिलांसाठी शॉल सेमी पंचू हा एक नवीन प्रकार बाजारात आला आहे. हा पंचू तुम्ही शॉल सारखा देखील वापरू शकता. तसेच त्याला एक क्लिप असल्यामुळे तुम्ही पंचू म्हणून देखील वापरू शकता. हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेन्डमध्ये आहे. हा तुम्ही साडी वरती, ड्रेस वरती किंवा इतर कोणत्याही पद्धतीच्या भारतीय किंवा पाश्चिमात्य पेहरावावर घेऊ शकता.