![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ नोव्हेंबर । राज्यात विविध शहरांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. पुण्यातील किमान तापमानाचा पारा सोमवारी ८.८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने गेल्या दहा वर्षांमधील नोव्हेंबरमधील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद शहरात सोमवारी ८.९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात निफाडमध्ये किमान तापमान ७ अंश सेल्सियस नोंदविले गेले, तर जळगावात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबईत सोमवारी पहाटे मुंबईकरांना नेहमीपेक्षा अधिक गारठा जाणवला. मुंबईतील सांताक्रूझ केंद्रावर किमान तापमान १७, तर कुलाबा येथे किमान तापमान २०.९ अंशांपर्यंत खाली उतरले. या मोसमातील सांताक्रूझ येथील आत्तापर्यंतचे सर्वात कमी तापमान सोमवारी नोंदवण्यात आले. नोव्हेंबर महिना हा थंडीचा नसला तरी राज्यभरात थंडी आणि गारठा जाणवू लागला आहे.
या आधी मुंबईत सन २०१६मध्ये नोव्हेंबर महिन्यात किमान तापमानाचा पारा १६.३ अंशांपर्यंत उतरला होता. त्यानंतर सन २०१७मध्ये १८, सन २०१८मध्ये १९.२, सन २०१९मध्ये २०.५, सन २०२०मध्ये १९.४ अंश सेल्सिअस अशा नोव्हेंबरमधील त्या-त्या वर्षाच्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. नोव्हेंबरमध्ये मुंबईत सरासरी किमान तापमान २१.४ अंश असते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वात कमी किमान तापमान १९.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले होते.
मुंबईच्या कमाल तापमानातही सोमवारी घट झाली. रविवारी कुलाबा येथे ३१.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवल्यानंतर सोमवारी हे तापमान ३०.७ अंशांपर्यंत खाली आले, तर सांताक्रूझ येथेही ३२.१ वरून ३१.७ एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरमध्ये सरासरी कमाल तापमान ३४.१ अंश सेल्सिअस असते.
