नारायण राणेंविरोधात आंदोलन ; शिवसेनेच्या आजी-माजी नेत्यांना हजर राहण्याचे निर्देश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २३ नोव्हेंबर । शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याच्या नारायण राणे ( Protest Against Narayan Rane ) यांच्या कृतीला विरोध दर्शवण्यासाठी १७ वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनाबद्दलच्या गुन्ह्याच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने शिवसेनेच्या आजी-माजी नेत्यांना १६ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. या नेत्यांमध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात असलेले आमदार सदा सरवणकर, मनसे नेते बाळा नांदगावकर व उद्धव ठाकरे गटातील आमदार अनिल परब यांचा समावेश आहे.

 

या प्रकरणाचा खटला पुढे नेण्याच्या दृष्टीने आरोपींविरोधात आरोपनिश्चितीची प्रक्रिया करायची असल्याने आजी-माजी आमदार-खासदारांविरोधातील प्रकरणांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नुकतेच हे निर्देश दिले. सध्या भाजपमध्ये असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी २००५मध्ये शिवसेनेला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी जुलै-२००५मध्ये राणे समर्थकांनी प्रभादेवीमध्ये शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या कार्यालयाजवळ सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी शिवसेनेत असलेले सरवणकर, नांदगावकर, परब व अन्य नेत्यांनी कार्यकर्त्यांसह जमून सभा उधळून लावण्यासाठी आंदोलन केले होते. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला होता. दादर पोलिसांनी या प्रकरणी नंतर या नेत्यांसह ४८ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यातील दहा आरोपींचे यापूर्वीच निधन झाले आहे.

हे प्रकरण पूर्वी माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात होते. या वर्षाच्या सुरुवातीला ते विशेष न्यायालयाकडे वर्ग झाले. सोमवारी याबाबत झालेल्या सुनावणीच्या वेळी जामिनावर असलेले अनेक आरोपी गैरहजर होते. त्यामुळे न्या. रोकडे यांनी १६ डिसेंबर रोजी सुनावणी ठेवून आरोप निश्चितीच्या प्रक्रियेसाठी सर्व ३८ आरोपींना हजर राहण्याचे निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *