जम्मुचे दोन यात्रेकरू नांदेडला कोरोनाग्रस्त ! नांदेडमधील बाधितांची संख्या ४०

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – संजीवकुमार गायकवाड – नांदेड (गोविंद करवा): जम्मू येथून नांदेडला आलेल्या दोन यात्रेकरूंना कोरोना ची बाधा झाल्याचे शनिवारी सकाळी समोर आले. नगिनाघाट परिसरातून गुरुवारी सायंकाळी काही यात्रेकरूंचे स्वब तपासणीसाठी घेतले असता त्यातील हे दोघे बाधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे नांदेडला कोरोना बाधितांची संख्या आता ४० झाली असून यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान शुक्रवारी रविनगर कौठा येथील आढळलेला कोरोना बाधित ट्रक चालक अनेक महिन्यापासून घरीच गेला नसल्याची माहिती मिळाल्याने तूर्तास त्या परिसराला कंटेंटमेंट झोन घोषित करण्यात आला नसल्याची माहिती मिळत आहे.

होळी सणादरम्यान नांदेडमधील होला महल्ला उत्सवासाठी देशातील वेगवेगळ्या भागातून शीख यात्रेकरू नांदेडमध्ये दाखल झाले. टप्याटप्प्याने हे यात्रेकरू नांदेडला दाखल होत असताना तिकडे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून देशभरात लॉक डाऊन सुरू झाले. प्रवासी वाहतुकीची खाजगी व सरकारी साधने बंद करण्यात आली. दळणवळण ठप्प झाल्यामुळे सुमारे चार हजार यात्रेकरू नांदेडला अडकून पडले. काही दिवसापूर्वी पंजाब राज्यातील यात्रेकरू शासनाच्या परवानगीने त्यांच्या गावी पोहचले असले तरी इतर बऱ्याच राज्यातील यात्रेकरू अजूनही नांदेडला अडकून आहेत.

दरम्यान, नांदेडला अडकलेल्या यात्रेकरूंची स्क्रिनिंगद्वारे वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले. परंतु येथून पंजाबला गेल्यानंतर बरेच प्रवासी कोरोनाग्रस्त निघाल्याने आढळल्याने नांदेडला त्यांच्या संपर्कात आलेल्या व येथे थांबलेल्या यात्रेकरू व इतर व्यक्तींचे स्वब घेणे सुरू आहे. नगिनाघाट व आसपासच्या परिसरातून आतापर्यंत शंभरहून अधिक व्यक्तींचे स्वब घेण्यात आले असून या परिसरात थांबलेले जवळपास ३० जण आतापर्यंत कोरोना संक्रमित झाल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासनाकडून या परिसरात बाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे स्वब घेणे सुरू झाले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी संत बाबा बलविंदर सिंघजी यांची भेट घेऊन सर्वांना स्वब देण्याचे आवाहन त्यांच्यावतीने करण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी दस्तुरखुद्द विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनीदेखील नगिनाघाट येथे जाऊन बाबाजींशी चर्चा केली. त्यानंतर जम्मू येथील १४ व हरियाणा येथील दोन यात्रेकरुंनी आपले स्वब आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. याच परिसरात असलेल्या वेगवेगळ्या इमारतीत आरोग्य सेवा पुरवून बाधित व त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. त्यामुळे स्वब घेण्यापासून देखभाल करणे व पुढील उपचाराचे काम आणखी सुलभ होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *