Shraddha Murder Case: आफताबची आठ तास ‘पॉलीग्राफ’ चाचणी ; तपासात धक्कादायक खुलासा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ नोव्हेंबर । श्रद्धा वालकरची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबने वापरलेले पाच चाकू त्याच्या घरी सापडले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. मात्र मृतदेह कापण्यासाठी कथितपणे वापरलेली करवत अद्याप सापडली नसल्याचं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिलं आहे. पोलिसांना सापडलेले चाकू पाच ते सहा इंचांचे असून, तपासासाठी फॉरेन्सिककडे पाठवण्यात आले आहेत.

आफताबची आठ तास ‘पॉलीग्राफ’ चाचणी
आफताब पूनावालाची गुरुवारी नवी दिल्लीतील जैवविज्ञान प्रयोगशाळेत ‘पॉलीग्राफ’ चाचणी करण्यात आली. सुमारे आठ तास ही चाचणी करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मात्र काही माहिती अपूर्ण आल्याने शुक्रवारी पुन्हा चाचणी करण्यात येणार आहे. दरम्यान, आफताबच्या नवी दिल्लीतील सदनिकेतून पोलिसांनी पाच चाकू जप्त केले असून हे चाकू हत्येसाठी वापरण्यात आले की नाही याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

एफएसएल रोहिणी येथे दुपारी १२ वाजता पूनावालाची ‘पॉलीग्राफ’ चाचणी सुरू झाली. त्याला ४० प्रश्न विचारण्यात आल्याचं जैवविज्ञान प्रयोगशाळेच्या संचालिका दीपा वर्मा यांनी सांगितलं. पूनावालाने चाचणीदरम्यान सहकार्य केलं. परंतु काही रेकॉर्डिग स्पष्ट झालं नाही, कारण त्याला सातत्याने शिंका येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पूनावाला याला ताप आणि सर्दी असल्याने बुधवारी चाचणी झाली नव्हती.

या चाचणीत पूनावालाला तपशील विचारण्यात आला. श्रद्धाला मारण्यासाठी तो कशामुळे प्रवृत्त झाला, हा नियोजित कट होता की न्यायालयात दावा केल्याप्रमाणे रागाच्या भरात हे कृत्य केले या प्रश्नासह घडलेला सर्व क्रम आणि मृतदेहाची विल्हेवाट कशा प्रकारे लावली याबाबत त्याला प्रश्न विचारण्यात आले.

श्रद्धाला सिगारेटचे चटके
आफताब श्रद्धाला सिगारेटचे चटके देत होता, अशी माहिती पुढे आली आहे. त्याविरोधात श्रद्धाला पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला तिच्या मित्राने दिला होता. मात्र श्रद्धाला त्याला आणखी एक संधी द्यायची होती. म्हणून तिने जाण्याचे टाळले, असा दावा तिच्या एका मित्राने गुरुवारी केला. आफताबसोबत नातेसंबंधात आल्यानंतर श्रद्धाने स्वत:ला तिच्या कुटुंबापासून दूर केले, असं या मित्राने सांगितलं. २०२१मध्ये श्रद्धाने तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला सांगितले की, आफताबने तिच्या पाठीवर सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर या मैत्रिणीने आफताबची भेट घेऊन त्याला पोलिसांत जाण्याची धमकी दिली होती.

श्रद्धाच्या मोबाइलचा भाईंदर खाडीत शोध
श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताबने तिचा मोबाइल फोन भाईंदरच्या खाडीत फेकल्याची माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दुपारी भाईंदरच्या खाडीत मोबाइल शोधण्याची मोहीम हाती घेतली. दोन पाणबुडय़ांच्या सहाय्याने तब्बल ५ तास ही शोधमोहीम सुरू होती. मात्र पोलिसांच्या हाती काही लागले नाही.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचा मोबाइल आफताबकडेच होता. ऑक्टोबर महिन्यात माणिकपूर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केल्यानंतर तो सावध झाला होता. याच काळात त्याने वसईला असताना तिचा मोबाइल भाईंदर खाडीत फेकल्याची माहिती दिल्ली पोलिसांना तपासादरम्यान मिळाली होती. या गुन्ह्याच्या अनुषंगाने श्रद्धाचा मोबाइल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी खाडीत फेकलेला मोबाइल शोधण्याचा निर्णय दिल्ली पोलिसांनी घेतला. त्यांचे एक पथक मागील आठवडय़ापासून वसईत आले. माणिकपूर पोलिसांच्या मदतीने गुरुवारी दुपारी २ वाजता ही मोहीम हाती घेण्यात आली. या कामासाठी दोन पाणबुडय़ाना पाचारण करण्यात आलं होतं. दुपारी २ ते संध्याकाळी ७ अशा वेळेत ही मोहीम सुरू होती. मात्र पोलिसांच्या हाती काही लागलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *